
मुंबई पोलिसांच्या 100 वर्षे जुन्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस दलात जोरदार रणधुमाळी सध्या रंगली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असून संचालक मंडळाच्या 13 पदांसाठी ही निवडणूक होत आहे. उमंग, संजीवनी, परिवर्तन, समर्थ, दक्षता अशी पाच पॅनेल उभे ठाकले असून 65 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 17 फेब्रुवारीला 13 पेंद्रांवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळीत मतदान होणार आहे.
पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ही शंभर वर्षे जुनी पतसंस्था आहे. 32 हजार सभासद आणि साडेचार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली ही राज्यातील सर्वात मोठी पतसंस्था आहे.
मेडिक्लेम, एफडी व्याजदर आणि नोकऱ्यांबाबत संजीवनी पॅनेलची हमी
पाचही पॅनेलचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यात संजीवनी पॅनलने पोलिसांच्या हिताचे मुद्दे हाती घेतले आहेत. सभासदांसाठी मेडिक्लेम योजना देण्याचे आश्वासन देतानाच कोरोनाकाळात कमी करण्यात आलेले मुदत ठेवींवरील व्याजदर पूर्ववत करण्याचे तसेच पतसंस्थेतील नोकऱ्यांमध्ये पोलीस पाल्यांसाठी 100 टक्के आरक्षण ठेवण्याची हमी पॅनेलने दिली आहे. त्यामुळे या पॅनेलची निशाणी असलेली रिक्षा जोरात आहे.
प्रचार शिगेला
सध्याचे संचालक मंडळ 15 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे पुन्हा प्रस्थापित की नव्यांना संधी अशी चुरस यंदाच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे. पाचही पॅनेल एकमेकांच्या प्रचारतंत्रावर आक्षेप घेत असून मतदानाला दोनच दिवस उरल्याने जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.