बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा हट्ट, नकार दिल्याने तरुणीला भोसकले

लग्नाला नकार दिल्याने भावाने बहिणीला भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांद्यातील आहे. जखमी झालेली तरुणी ही कायद्याचे शिक्षण घेत असल्याचे कळाले आहे. या तरुणीला राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे.

मूळची जालौन इथे राहणारी पीडिता ही तिच्या मामाकडे राहून आपले एलएलबीचे शिक्षण पूर्ण करत आहे. मामाचा मुलगा ज्ञान प्रकाश हा देखील या मुलीसोबतच एलएलबीचे शिक्षण घेत आहे. एकत्र राहताना, अभ्यास करताना ज्ञान प्रकाश याला पीडिता आवडायला लागली होती. ज्ञान प्रकाश हिने पीडितेला लग्नासाठी मागणीही घातली होती. पीडितेने ही मागणी धुडकावून लावली होती. शुक्रवारी याच मुद्दावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळे संतापलेल्या ज्ञान प्रकाश याने पीडितेच्या गळ्यावर वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळलेली पाहताच ज्ञान प्रकाशने तिथून पळ काढला होता. पीडितेला तिच्या मामानेच रुग्णालयात दाखल केलं.

पोलिसांनी सदर प्रकाराबद्दल माहिती देताना सांगितलं की शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारस एक व्यक्ती तिच्या भाचीला घेऊन रुग्णालयात आला होता. तरुणीची अवस्था नाजूक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. प्रकरणाचा तपास केला असता आम्हाला कळालं की पीडीतेचा मामेभाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता आणि त्यावरून झालेल्या वादातून त्याने तरुणीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची प्रकृती आता सुधारत असून ती बोलायला लागली आहे. तिला आणखी बरं वाटू लागल्यानंतर पोलीस तिचा जबाब नोंदवणार आहेत. तिचा जबाब नोंदवल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करू शकतील. तूर्तास हल्लेखोर ज्ञान प्रकाश हा फरार आहे.