राज्यसभेचे कामकाज तब्बल 41 दिवसांनी सुरळीत

rajya sabha
फाईल फोटो

राज्यसभेच्या सुरळीत कामकाजाला आज अखेर 41 दिवसांनंतर मुहूर्त मिळाला. विविध कारणांनी तसेच गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार निलंबित केल्याच्या कारणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यसभेचे कामकाज चालू शकले नव्हते. आज राज्यसभेचे कामकाज संसदेच्या नवीन कोरोना नियमावलीनुसार राज्यसभेचे कामकाज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत निर्विघ्नपणे पार पडले.

21 डिसेंबर 2021 रोजी राज्यसभेचे कामकाज सुरळीतपणे पार पडले होते, मात्र केवळ खासगी विधेयकावर त्या दिवशी चर्चा झाली होती. वास्तविक, 19 मार्च 2021 हा राज्यसभेचे कामकाज निर्विघ्नपणे पार पडल्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे आज अनेक दिवसांनी राज्यसभेचे कामकाज सुरळीत पार पडल्याचा आनंद सदस्यांसह कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर होता.

उपसभापतीच जेव्हा मास्क काढतात

राज्यसभेचे कामकाज सुरू असताना काँग्रेसचे आनंद शर्मा काही मुद्दा मांडत असताना सत्ताधारी खासदारांनी गदारोळाला सुरुवात केली. यावेळी सदस्यांना शांत करताना उपसभापती हरिवंश सिंग यांनी तोंडावरचा मास्क काढला. अर्थात चूक लक्षात आल्यानंतर उपसभापतींनी लगेच मास्क लावलाही.

लपवाछपवी थांबवा – खरगे

राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला चिमटे घेत चांगलीच टोलेबाजी केली. सत्तेवर आल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांत हे सरकार दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, असे वारंवार सांगत आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आगामी पाच वर्षांत 60 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे. नेमके खरे कोणते. सात-आठ वर्षांत तुमच्या हिशेबाप्रमाणे 15 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता, असा टोला मारताना रोजगाराचा प्रश्न गंभीर असून देशातील तरुण पिढीच्या भावनांशी खेळू नका, वस्तुस्थिती स्पष्ट करा, अशी मागणीही खरगे यांनी केली.