अजबच…! म्हशींचं अपहरण करून लाखोंची खंडणी मागितली

900

सामना ऑनलाईन, उजैन

मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यात चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. येथे काही चोरट्यांनी शेतातून म्हशी चोरून नेल्या आहेत आणि मालकाकडे त्या बदल्यात लाखो रुपयांची खंडणी मागितली. दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्याने म्हशीच्या मालकाने पोलिसात धाव घेतली असून फिर्यादीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंगूरबाला हाडा यांच्या मालकीच्या दुग्धशाळेमधून चोरट्यांनी म्हशीचे अपहरण केले. गेल्या वर्षी जुन महिन्यातही त्यांच्या चार म्हशींचे अपहरण झाले होते. त्यावेळी त्यांनी 1.35 लाख रुपये देऊन म्हैस सोडवून आणली होती. यानंतर त्यांनी दुग्धशाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरीही लावले होते. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला असून यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरीही चोरले आहे.

म्हशींच्या चोरीप्रकरणी फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्याभरापूर्वी रात्री उशिरा अपहरणकर्त्यांनी फोन करून म्हशीचे अपहरण केल्याचे सांगितले. यावेळी चोरट्यांच्या टोळीने मुर्रा जातीच्या या म्हशींच्या बदल्यात आधीपेक्षा अधिक खंडणीची मागणी केली. मुर्रा जातीच्या एका म्हशीची किंमत जवळपास दीड ते दोन लाख रुपयांच्या आसपास आहे.

दरम्यान, एखाद्या जनावराचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही काळात वाढ झाली आहे. याआधीही या भागात जनावरांची चोरी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडील जनावरे चोरीला जातात मात्र कोणीही पोलिसांत तक्रार करत नाहीत व खंडणीची रक्कम देऊन मोकळे होतात. परंतु एकाच दुग्धशाळेतून दोन वेळा जनावरे चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या