श्री संत गजानन महाराजांचा 114 पुण्यतिथी उत्सव 4 ते 8 सप्टेंबर या काळात धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी काकडा, गाथा भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री 8 ते 10 श्रीहरी कीर्तन संपन्न झाले.
या सप्ताहात ह.भ.प. संदिप बुवा डुमरे कल्याण, ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे पुसद, ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते सिरसोली, ह.भ.प. भरत बुवा पाटील म्हैसवाडी, ह.भ.प. बाळु बुवा गिरगांवकर गिरगांव आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले. श्री गणेशयाग व वरूणयागास भाद्रपद शु.1 ला प्रारंभ होवून भाद्रपद शु. 5 ला सकाळी 10 वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्य श्रीहरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी श्री पुण्यतिथी उत्सवांत 448 दिंड्या व एकूण 14,118 वारकरी येऊन गेले. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण 87 नवीन दिंड्यांना 10 टाळ, 1 विणा, 1 मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या.
जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकर्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली होती. उत्सव काळात शेगावसह पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा या सर्व शाखांवर श्रींचा समाधी उत्सव संपन्न होऊन 1 लाख 5 हजार भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशारितीने श्रीकृपेने वारकर्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे अशी माहिती संस्थानाने दिली.