जेसीबीने बैलाची हत्या करणाऱ्या दोघांवर गुन्हा, बारामतीतील पोंधवडी येथील घटना

2546

मोकाट बैलाची अत्यंत क्रूरपणे जेसीबीच्या सहाय्याने हत्या करून त्याला जमिनीत गाडल्याप्रकरणी दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बारामती तालुक्यातील पोंधवडी येथे ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

गोटय़ा ऊर्फ रोहित शिवाजी आटोळे व भाऊसाहेब अण्णा खारतोडे (दोघेही, रा. पोंधवडी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोंधवडी गावात एका मोकाट बैलाला काही दिवसांपूर्वी पिसाळलेले कुत्रे चावले. त्यानंतर हा बैलही पिसाळला. बैलाकडून नागरिकांवर हल्ले सुरू होते. या बैलाने अनेक दुचाकी, सायकलींची मोडतोड केली होती. याशिवाय एका घराचा दरवाजा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोखंडी गेटदेखील तोडले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

27 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास गोटय़ा उर्फ रोहित हा जेसीबीच्या सहाय्याने काम करीत होता. यावेळी त्याला हा बैल दिसला. त्याने जेसीबीच्या बकेटने या बैलाला क्रुरपणे गंभीर जखमी केले. यात बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बैलाला जेसीबीद्वारे येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे जमिनीत गाडले. या घटनेचे भाऊसाहेबने मोबाईलवर चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या