
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना कर्दनकाळ ठरू लागली आहे. या प्रकल्पासाठी गाव परिसरात बोगद्याचे काम सुरू असून त्यासाठी केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे जलसार, टेंभीखोडावे, विराथन या गावांतील अनेक घरांना तडे गेले आहेत. तर काही घरांचे पत्रे तुटले आहेत. सलग होणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांमुळे येथील गावकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.
पालघरमधील ग्रामस्थांचा विरोध असतानाही बुलेट ट्रेनसाठी अनेक ठिकाणी बळाचा वापर करून तर काही ठिकाणी आर्थिक लालूच दाखवून जमिनी संपादन करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर त्याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसू लागला आहे.
जलसार गावालगत असणाऱ्या डोंगरातून बुलेट ट्रेनसाठी बोगदा तयार केला जात आहे. या बोगद्यासाठी मोठमोठे सुरुंग स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटाच्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जलसार, टेंभीखोडावे आणि विराथन बुद्रुक या गावातील घरांना मोठा तडाखा बसला. या गावांमधील दोनशेपेक्षा अधिक घरांतील भिंती आणि लाद्यांना तडे गेले आहेत. अंगणवाड्यांचे छत कोसळले आहे. बोगदा पूर्ण होईपर्यंत सुरुंग स्फोट करावेच लागतील, असे ठेकेदार कंपनीने सांगितल्याने या परिसरातील गावकरी भयभीत झाले आहेत.
नुकसानभरपाईचा प्रश्न अधांतरी
एकीकडे जलसार, विराथन आणि टेंभीखोडावे गावात स्फोटांमुळे गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असतानाच याआधी स्फोटांमुळे नुकसान झालेल्या दारशे तपाडा, पाटीलपाडा, खिराटपाडा, गेटपाडा, धोधडेपाडा, धुमाडापाडा या पाड्यांमधील दोनशेपेक्षा अधिक घरांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे.
अभ्यास करून ठरवू
संयुक्त अभ्यासदौरा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केला जाईल आणि त्यानुसार नुकसानभरपाई प्रस्तावित केली जाईल, अशी माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.