गोलंदाजांमध्ये नेतृत्वाची क्षमता असूनही त्यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याचे दुःख जसप्रीत बुमराशिवाय आणखी कुणीही सांगू शकत नाही. त्याने हिंदुस्थानच्या महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल आपले प्रभावी विचार मांडले; पण गोलंदाज स्मार्ट नेतृत्व करू शकतात, असे वक्तव्य करत त्याने आपलीही नेतृत्व करण्यास पसंती असल्याचे संकेत दिले आहेत.
यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवल्यानंतर जसप्रीत बुमराला ही गोष्ट खटकली होती आणि त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रागही व्यक्त केला होता. तेव्हा बुमरा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. बुमराकडे हिंदुस्थानी संघाचे तात्पुरते नेतृत्वही आले होते आणि त्याने ते यशस्वीपणे भूषवलेसुद्धा. बुमरानुसार गोलंदाजांमध्ये नेतृत्व करण्याची अद्वितीय क्षमता असते.
बुमरा आपल्या नेतृत्वक्षमतेबद्दल म्हणाला, गोलंदाज हे अधिक स्मार्ट असतात, कारण ते फलंदाजांना बाद करतात. जेव्हा आम्ही सामना हरतो तेव्हा साधारणतः पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले जाते. त्यामुळे ही एक कठीण जबाबदारी आहे. कपिल देव, इम्रान खान, वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या वेगवान गोलंदाज असलेल्या कर्णधारांचे उदाहरण बुमराने दिले. कपिल देव यांनीच हिंदुस्थानला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकून दिला, तर पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देण्याची किमया इम्रान यांनी करून दाखवली. त्यामुळे गोलंदाज हे स्मार्ट असल्याचेही तो अभिमानाने म्हणाला.
कोहली कर्णधार नाही, तरीही लीडर
विराट कोहलीने हिंदुस्थानी संघाच्या फिटनेसची व्याख्याच बदलून टाकली. त्याने संघाचे कर्णधारपद सोडले असले तरी त्याची नेतृत्व क्षमता संघात कायम आहे. तो एक ऊर्जावान खेळाडू आहे, जिद्दी आहे आणि सदैव आक्रमक असतो. त्याच्या या गुणांमुळे तो आजही संघाचा लीडर आहे. कर्णधार हे एक पद आहे, पण संघ 11 खेळाडूंनी चालतो.
बुमराच्या खेळावर तिन्ही कर्णधारांचा प्रभाव
जसप्रीत बुमराने हिंदुस्थानी संघात पदार्पण धोनीच्या नेतृत्वाखाली केले, तर त्याचा खेळ बहरला तो कोहलीच्या कर्णधारपदाखाली. रोहितने संघाचे नेतृत्व सांभाळले तेव्हा त्याला स्वंतत्रपणे खेळण्याची संधी मिळाली. रोहित एक फलंदाज असला तरी त्याला गोलंदाजांबद्दल अधिक सहानुभूती आहे. तो कठोर नसल्याचेही बुमरा म्हणाला.