
कणकवली नरडवे रोडवरील कनकनगर येथे उभी असलेली सीएनजी कारने सोमवारी अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सीएनजीवर चालणाऱ्या कारचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईहून दारिस्ते येथे जाणारे कुटुंब या कारमधून प्रवास करत होते. कारमध्ये बिघाड झाल्याने कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. काही वेळातच कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.


























































