
इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी घालण्याची तयारी केली आहे. यासंदर्भातील विधेयक ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाने संसदेत सादर केले. धार्मिक कट्टरतावाद, इस्लामी फुटीरतावाद आणि सांस्कृतिक दरी संपवणे हा विधेयकाचा उद्देश आहे. इटलीची राष्ट्रीय एकता व सामाजिक समरसता टिकवण्यासाठी याची मदत होईल, असा दावा इटलीच्या सरकारने केला. या कायद्याचे उल्लंघन केल्यास सुमारे 26 हजार ते 2.6 लाख रुपये इतका दंड करण्याची तरतूद विधेयकात आहे. मुस्लिम संघटना आणि विरोधकांनी नव्या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. या विधेयकाने इटलीतील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी मेलोनी सरकारला घेरले आहे. नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यतेवर घाला घालण्याचा कट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मेलोनी सरकार बहुमतात आहे. त्यामुळे हे विधेयक संसदेत संमत होणे निश्चित आहे.
मुस्लिम संघटनांचा विरोध
इटलीत सुमारे पाच लाख मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यांनी विधेयकाला विरोध केला आहे. महिलांचे स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे विधेयक असल्याची टीका इटलीतील प्रमुख मुस्लिम संघटनांनी केलीय. विधेयकावरील चर्चेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.