रील्सचे वेड मुक्या जनावरांच्या जीवावर बेतले; सरकारी बसचालकाचा प्रताप पाहून नेटकरी संतापले!

कर्नाटकातील हुबळी येथे संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका सरकारी बसचालकाने रील्स बनवण्याच्या नादात बस बैलगाडीला ठोकल्याची घटना समोर आली आहे. या धडकेत दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन शेतकरी गंभीर जखम झाले. बसचालक बस चालवत असतानाच रील्स बनवण्यात मग्न असल्याने हा कथित अपघात घडला. जखमी शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताची घटना उघडकीस येताच नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NWKRTC) ने बसचालकाला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच चालकावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक (DSS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, सदर बस हुबळीहून बाळकोटला चालली होती. बस चालवत असतानाच चालक रील्स बनवण्यात मग्न होता. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बैलगाडीला धडकली. बस बैलगाडीला आदळण्यापूर्वी काही सेकंद आधी एक व्हिडिओ कॅप्चर केला गेला आहे. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे मुकी जनावरे प्राणास मुकली.