
शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ मणदूर गावच्या हद्दीत अचानक वणवा लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये अनेक औषधी वनस्पतींसह किमती सागवान वृक्ष जळून खाक होण्याची भीती आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्यप्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास हा वणवा लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग मोठी असल्याने नियंत्रण मिळवता आले नाही. वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. चार रोजंदार वनमजूर ही लागलेली आग विझवण्यासाठी कार्यरत होते. बुधवारीही आग सुरू होती. यामुळे जंगलातील अनेक झाडांचे नुकसान झाले असून, अनेक वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. अखेर बुधवारी रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली आहे.
जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी आग लागून हजारो झाडांचे नुकसान होण्याचा प्रकार घडत आहेत. मात्र, वन विभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. आग लागल्यानंतर वनकर्मचारी कोणत्याही अग्निशमन साधनांशिवाय आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी वन विभागाच्या वरिष्ठांशी तत्काळ संपर्क न झाल्याने आगीचे रूपांतर वणव्यात होते. परिणामी अधिक नुकसान होते. एकीकडे जंगल भागात लागणाऱया वणव्यांवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱया बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम करायचे, अशी विरोधाभासाची स्थिती आहे.