कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा सख्खा भाऊ मजूर! बोगस संस्थेविरूद्ध उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण

अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचे सख्खे भाऊ अब्दुल गफार अब्दुल नबी 2023 च्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर सहकारी संघाची निवडणूक लढवून सध्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले आहेत. निवडणूक अर्ज छाननीच्या वेळेस सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरलाल शंकरपेल्ली व गिरजा माता मजूर सहकारी संस्था कन्नडचे चेअरमन शेख पाशु शेख यासीन यांनी लेखी आक्षेप सादर केला होता. त्यात त्यांचा सख्खा भाऊ अब्दुल गफ्फार हा मजूर असल्याचे म्हटले होते. परंतु पुरावे देऊनही कारवाई न केल्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आक्षेपामध्ये अत्यंत गंभीर आरोप लावून सोबत पुरावे सादर करण्यात आले होते. तक्रारदार यांच्या आक्षेपानुसार अब्दुल गफार अब्दुल नबी यांची नालंदा मजूर सहकारी संस्था मर्यादित मौजे उपळी तालुका सिल्लोड पूर्णपणे बोगस संस्था आहे.

उपजिल्हा निबंधक मुकेश बारहाते यांनी दोन्ही आक्षेपांत निर्णय देताना स्पष्ट केले की, सदर प्रकरणात सहाय्यक निबंधक सिल्लोड यांच्याकडे अधिनियमातील कलम ११ नुसार तक्रार करणे अपेक्षित असून त्यांना कायद्यानुसार सर्वाधिकार आहेत. त्यानुसार शंकरपेल्ली व शेख पाशु या दोघांनी फेब्रुवारी 2024 रोजी तत्कालीन सहाय्यक निबंधक डी. आर. मातेरे यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु मातेरे मागील आठ वर्षापासून सिल्लोड कार्यालयात एकाच पदावर विराजमान होते. त्यांना राजकीय अभय प्राप्त असल्याने तक्रारदार यांनी त्यांची तक्रार दिल्यानंतर सिल्लोड येथून त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.

सदर पदावर कोणताही अधिकारी विराजमान होण्यास इच्छुक नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे सध्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी गाजुलवाड यांची नियुक्ती सिल्लोड सहाय्यक निबंधक पदावर केलेली आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात अध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी मजूर संघात पदाचा गैरवापर करून पैशाचा अपहार केला आहे, अशी सुद्धा स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार लेखा परीक्षक यांचा अहवाल प्राप्त झालेला असून, त्यात त्यांनी आरोपात तथ्य असल्याचे नमूद केले आहे. मागील आठ महिन्यापासून तक्रारदार यांनी वरील प्रकरणात सातत्याने अर्ज निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु कॅबिनेट मंत्री ब पालकमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असल्याने, अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत, असा गंभीर आरोप तक्रारदारांनी केलेला आहे.

सदर प्रकरणात जिल्ह्याबाहेरील सक्षम अधिकाऱ्यांची समिती गठित करून प्रकरणाची सखोल चौकशी व तपास करावा, प्राप्त अहवालानुसार तात्काळ कारवाई करून अब्दुल गफार यांना अपात्र करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच संस्थेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तक्रारदारांनी केली आहे. 15 ऑगस्ट 2024 चे औचित्य साधून तक्रारदार यांनी उपजिल्हा निबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगरसमोर आजपासून आपल्या मागण्या संदर्भात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आली होती.

अब्दुल गफार यांची मालमत्ता

संस्थेच्या उपविधीमधील नियमानुसार संस्थेचा सभासद हा अंगमेहनत करणारा मजूर असावा, तो उपळी गावाचा रहिवासी असावा, अल्पभूधारक असावा. परंतु अब्दुल गफार हे उपळीचे नाही, तर सिल्लोड शहराचे रहिवासी आहेत. सिल्लोड शहरातील मतदान यादीत त्यांचे नाव सुद्धा आहे. अब्दुल गफार यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता, दोन मंगल कार्यालये, दोन स्टोन क्रशर प्लांट, सॉ मिल, लॉजिंग बोर्डिंग, मोठमोठे बंगले व गाड्या इत्यादी आहेत. त्यामुळे ते अंगमेहनत करणारे मजूर कसे काय?