ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने त्याची भरपाई करण्यासाठी यू-ट्यूब बघून तब्बल 18 बुलेट चोरल्या. या चोरीतून मिळालेले पैसे पुन्हा ऑनलाइन गेममध्ये हरला. चाकण पोलिसांनी परिसरातील 150 सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्याच्या संगमनेर येथील घरापर्यंत माग काढला आणि त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून 26 लाख रुपये किमतीच्या 11 बुलेटसह 18 दुचाकी जप्त केल्या आहेत.
अभय सुरेश खर्डे (वय 23, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला चोरीच्या बुलेटविक्रीसाठी मदत करणारे रवींद्र निवृत्ती गव्हाणे (वय २३, रा. अंजनापूर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर), शुभम बाळासाहेब काळे (वय 24, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर), यश नंदकिशोर थुट्टे (वय 22, रा. चिखली, जि. बुलढाणा, सध्या रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (वय 20,रा. अशोकनगर, नाशिक) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या 26 लाख रुपयांच्या 18 दुचाकी जप्त केल्या. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. एका ठिकाणी चोरी झालेल्या बुलेटच्या शोधासाठी पोलीस 150 सीसीटीव्ही फुटेज पाहत संगमनेरपर्यंत पोहोचले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चाकणआणि आसपासच्या परिसरातून 18 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच, चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी त्याला मदत करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली. त्यांनी ग्रामीण परिसरात विकलेल्या चोरीच्या 18 दुचाकी जप्त केल्या. सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, राजू जाधव, ऋषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनील भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरनार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बुलेट चोरीवर भर
आरोपी अभय खर्डे याला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद होता. यामध्ये तो पैसे हरला. हरलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. यू-ट्यूबवर पाहून त्याने दुचाकी चोरी कशी करायची, हे शिकला. बुलेटला किंमत मिळत असल्याने तो सहसा बुलेटच चोरी करीत असे. त्याच्या ताब्यातून 26 लाख रुपयांच्या 11 बुलेट, सहा स्प्लेंडर व एक यामाहा दुचाकी जप्त केल्या आहेत