एलफिन्स्टन पूल पाडकामात निष्काळजीपणा,पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष

एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामाला गती देताना पादचाऱयांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागले आहे. पुलाच्या दगड-मातीचा ढिगारा दुसरीकडे नेण्यासाठी येणारी मोठमोठी वाहने बेफिकीरपणे चालवली जात आहेत. त्यामुळे पादचारी, स्थानिक नागरिकांना चालणे धोक्याचे बनले आहे. पालिका, एमएमआरडीए व इतर सरकारी यंत्रणांनी कंत्राटदाराच्या हाती पुलाचे पाडकाम सोपवून पादचारी सुरक्षेची स्वतःची जबाबदारी झटकल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम करण्यापूर्वी पादचाऱयांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पादचारी पूलदेखील अद्याप खुला केलेला नाही. त्यामुळे पादचारी, स्थानिक नागरिक, परळ परिसरातील रुग्णालयांमध्ये जाणारे रुग्ण, वृद्ध, दिव्यांग लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच सध्या पुलाच्या पाडकामामध्ये वापरली जात असलेली अवजड वाहने धोकादायक पद्धतीने चालवली जात आहेत. यात गंभीर अपघात घडण्याचा धोका आहे. सरकारी यंत्रणांनी कंत्राटदाराकडे काम सोपवून केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. पादचाऱयांसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था, एस्केलेटरची व्यवस्था न करता एलफिन्स्टन पूल पाडण्याची घाई करण्यात आली आहे. पालिका प्रशासन, एमएमआरडीए व इतर सरकारी यंत्रणांनी आणखी बेफिकीर न राहता पादचाऱयांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी परळ येथील स्वामी संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाड यांनी केली आहे. पूल पाडकामाच्या ठिकाणी कोणीही सरकारी अधिकारी देखभाल करीत नाहीत, सर्व ठेकेदारावर सोडले आहे. ठेकेदाराचे कामगार कुठलीही खबरदारी न घेता तोडफो़ड करीत आहेत. याचा पादचाऱयांना त्रास होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे लाड यांनी म्हटले आहे.