सिनसिनाटीमध्ये सनसनाटी उलटफेर; कार्लोस अल्कराजचा पराभव, संतापाने टेनिस रॅकेट तोडली

सिनसिनाटी ओपनमध्ये स्पेनचा तरुण खेळाडू कार्लोस अल्कराज याला पराभवाचा सामना करावा लागला. चार वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या अल्कराज याला फ्रान्सच्या गेल मोनिफ्लस याने 4-6, 7-6 (7-5) आणि 6-4 असे पराभूत केले. या पराभवामुळे सैरभैर झालेल्या अल्कराजने आपला राग टेनिस रॅकेटवर काढला आणि मैदानावर आपटून आपटून रॅकेट तोडली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुरुवारी पावसाचा व्यत्यय आलेल्या या लढतीत अल्कराजने चांगली सुरुवात करत पहिला सेट आरामात जिंकला. मात्र त्यानंतर 37 वर्षीय गेल मोनफिल्स याने दुसरा सेट टायब्रेकवर जिंकला आणि अल्कराजवर दबाव टाकला. या दबावाखाली अल्कराज दबला गेला आणि त्याच्याकडून एकामागोमाग एक चुका झाल्या. याचा फायदा उठवत गेलने तिसरा सेट आणि सामनाही नावावर केला.

या पराभवानंतर अल्कराजने टेनिस रॅकेट तोडून आपला संताप व्यक्त केला. तसेच टेनिस कारकिर्दीतील हा सर्वात वाईट सामना होता असेही तो म्हणाला. हा माझ्या टेनिस कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना होता. मी चांगला सराव केला होता, पण त्याप्रमाणे मला खेळता आले नाही. मी हा सामना विसरण्याचा प्रयत्न करेन, असे अल्कराज सामना संपल्यानंतर म्हणाला.

दरम्यान, टेनिस रॅकेटवर राग काढून ती मोडल्याबद्दल अल्कराजने दिलगिरी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर माझे वागणे योग्य नव्हते. मी टेनिस कोर्टवर तसे वागायला नको होते. अशी चूक पुन्हा होणार नाही, असे अल्कराज म्हणाला.