‘कार्निवल’ सुरू करणार कश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

370 कलम हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनवलेल्या जम्मू-कश्मीरकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. तेथील अप्रतिम निसर्गसौंदर्याचा उपयोग आगामी चित्रपटांच्या शुटींगसाठी करण्याच्या योजना बॉलिवूडमध्ये बनवल्या जात असतानाच ‘कार्निवल सिनेमा’नेही कश्मीरमध्ये एन्ट्री मारण्याचे ठरवले आहे. जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये मल्टीप्लेक्स उभारून तिथे अनुक्रमे 30 आणि 5 स्क्रीन्स सुरू करण्याचा निर्णय कार्निवलने घेतला आहे.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात लवकरच जम्मू-कश्मीरमध्ये पूर्वीचे दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला होता. एकेकाळी कश्मीर म्हणजे बॉलिवूडमधील निर्मात्यांचे आवडते शुटींगस्थळ होते. त्यावेळी कश्मीरमध्ये शुटींग झाले नाही असा चित्रपट  क्वचित असेल. जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये जगातील एक मोठे पर्यटन बनण्याची क्षमता आहे आणि सिनेसृष्टीनेही तिथे गुंतवणूक करावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना रोजगारही मिळू शकणार आहेत असे त्यांनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या त्या आवाहनाला ‘कार्निवल सिनेमा’ने प्रतिसाद देत मल्टीप्लेक्स सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या