डुप्लिकेट इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी नंबर म्हणजे बोगस मतदार होत नाही, हेराफेरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर

विविध राज्यांमध्ये मतदारांना देण्यात आलेला समान एपिक क्रमांक म्हणजेच डुप्लिकेट इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी नंबरप्रकरणी विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती. मतदार याद्यांमध्ये फेरफार होऊन बोगस मतदार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. डुप्लिकेट इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर म्हणजे बोगस मतदार आहेत असे होत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजपने बोगस मतदार घुसवून विजय मिळवला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही वारंवार मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात तब्बल 70 लाख मतदार कसे वाढले असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. निवडणूक आयोगाने मतदारांना दिलेल्या एपिक क्रमांकावर विरोधकांकडून प्रचंड आक्षेप नोंदवण्यात आला होता, मात्र आता निवडणूक आयोगाने एपिक क्रमांकांचे समर्थन केले आहे.