बेकायदा 27 फ्लेक्सबाजांवर गुन्हे दाखल, बेकायदा फ्लेक्स बॅनर्सवर जोरदार कारवाई

पुणे शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत आतापर्यंत 5 हजारांहून अधिक बेकायदा फलक हटविण्यात आले आहेत. 71 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचे पत्र स्थानिक पोलिसांना दिले असून, त्यापैकी 27 प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, राजकीय फ्लेक्सबाजीला मूकसंमती देत प्रशासन केवळ व्यावसायिकांच्या बॅनर्सवरच लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

शहराच्या बेकायदा फलक लावून विद्रुपीकरणाचे प्रकार वाढले आहेत. शहरातील रस्ते, विजेचे खांब आणि चौकांमध्ये हजारो बेकायदा फ्लेक्स आणि बॅनर्स लागले आहेत. याविरोधात विशेष मोहीम राबवून संबंधित फ्लेक्स व बॅनर्स काढून ते लावणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मागील आठवड्यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. स्वतः अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त माधव जगताप आणि पाचही झोनल उपायुक्त कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 5 हजारांहून अधिक बेकायदा फलक हटविण्यात आले आहेत. तसेच 71 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचे पत्र स्थानिक पोलिसांना देण्यात आले असून, त्यापैकी 27 प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

कारवाईत पालिकेचा दुजाभाव?

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय फ्लेक्सबाजी सुरू आहे. मात्र, अशा बॅनर्सकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, केवळ व्यावसायिकांच्या जाहिरातींवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्यावसायिकांकडून करण्यात येणाऱ्या फ्लेक्सबाजीवर कठोर कारवाई होत असताना, राजकीय पक्षांच्या पोस्टरबाजीवर कारवाईचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासन निवडणूकपूर्व काळात दबावाखाली काम करत असल्याची टीका शहरात सुरू आहे.