सावधान… इथे नीलगाईंचा संचार आहे, शहापूरच्या धसईत वनविभागाने लावले फलक

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

नीलगाईंचा वाढता वावर आणि त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वनविभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहापूरच्या धसईत सावधान… इथे नील गाईंचा संचार आहे, वाहने सावकाश चालवा असे फलक लावण्यात आले आहेत. दाट जंगल ातून जाणाऱ्या रस्त्यांवर नीलगाई अचानक समोर आल्याने अनेक अपघात झाले आहेत. यात बऱ्याचदा जखमी झालेल्या नीलगाईंचा मृत्यू झाला असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धसई वनक्षेत्र परिसरात अस्नोली, शेणवे, उंभ्रई, कानवे, खरीड, मानेखिंड, टाकीपठार, सावरोली या राखीव वनक्षेत्रात दाट जंगल वाढले आहे. या जंगलात शेकडो जातीचे पक्षी आणि दुर्मिळ प्राणी वास्तव्य करत आहेत. यात नीलगाईंचा समावेश आहे. त्यामुळे नीलगाईंची संख्याही वाढली आहे. चारा, पाण्याच्या शोधात नीलगाई कधी कधी वाहतुकीच्या मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा भरधाव वाहनाखाली येऊन नीलगाईंचा हकनाक बळी जात आहे. याबाबत प्राणीमित्रांनी आवाज उठवल्यानंतर वनविभागाने वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती फलक रस्त्याच्या कडेला झळकवले आहेत.

सोगाव रस्त्यावर अपघात

काही दिवसांपूर्वी सोगाव रस्त्यावर वनविभागाच्या चिखलगाव येथील कार्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या नीलगाईने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला वृद्ध रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. नीलगाई रस्ता ओलांडताना वेगाने धावतात, त्यामुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे नीलगाईंचा संचार असलेल्या क्षेत्रातील रस्त्यांवर सूचना फलक लावले आहेत. चालकांनीसुद्धा दक्षता घ्यावी असे किन्हवली वनपाल प्रदीप बांगर यांनी सांगितले.