
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. २२८ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जय अनमोल अंबानी यांची सलग ६ तासांहून अधिक काळ चौकशी केली. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) मधील कर्ज वाटपाशी संबंधित असलेल्या या व्यवहारामुळे अंबानी कुटुंबाच्या कायदेशीर अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने जय अनमोल अंबानी यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असताना त्यांनी काही कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या मंजुरीबाबत सीबीआयने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. सुमारे ६ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या चौकशीत कर्ज देण्याचे निकष, नियमांचे उल्लंघन आणि या व्यवहारांमागील उद्देशांबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने काही ठराविक संस्थांना दिलेल्या मोठ्या कर्जांशी संबंधित आहे. आरोपानुसार, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अशा कंपन्यांना कर्ज दिले, ज्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक नव्हती. पुढे हे कर्ज थकीत झाले (NPA), ज्यामुळे बँकांचे २२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच गुन्हा दाखल केला असून त्या तपासाचा भाग म्हणून ही चौकशी करण्यात आली.

























































