
केंद्रीय बोर्ड एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची इयत्ता नववी ते बारावीची पुस्तके पुढील वर्षापासून म्हणजेच 2026 पासून स्वस्त होतील. सीबीएसई बोर्डाच्या पुस्तकांच्या किमती कमी करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत केली. एनसीईआरटी सध्या 5 कोटी पुस्तकांच्या प्रती वर्षाला छापते. पुढील वर्षापासून 15 कोटी पुस्तके छापण्याचे ध्येय ठेवण्यात येईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
नववी ते बारावीची नवी पुस्तके 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होतील असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. पुढील वर्षापासून 15 कोटी पुस्तकांच्या प्रती छापण्यात येतील. त्याचबरोबर या पुस्तकांचा दर्जा उत्तम असेल आणि ती परवडणारी असतील असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. पालकांवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण येऊ नये म्हणून पुस्तकांच्या किमती कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नीटची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, लवकरच निर्णय
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी पेन व पेपरवर म्हणजेच ऑफलाइन घ्यायची की ऑनलाइन याबद्दल चर्चा सुरू असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चेचे दोन राऊंड झाल्याचे त्यांनी सांगितले.