पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून (पाकिस्तान वेळेनुसार) 48 तासांसाठी तात्पुरता युद्धविराम लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. हा निर्णय सीमारेषेवर झालेल्या ताज्या चकमकीनंतर घेण्यात आला असून, त्यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव वाढला होता.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या या युद्धविरामाचा उद्देश सीमावरील वाढत्या संघर्षानंतर शत्रुत्व कमी करणे आणि संवादाचा मार्ग मोकळा करणे हा आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही बाजू हे गुंतागुंतीचे पण सोडवता येण्याजोगे प्रकरण प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करतील.

हा युद्धविराम अफगाणिस्तानच्या दक्षिण कंधार प्रांतातील भीषण लढाईनंतर लागू करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ले केले. अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्पिन बोल्डक जिल्ह्यातील निवासी भागांवरील हल्ल्यांमध्ये किमान 15 नागरिक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले, ज्यात महिला लहान मुलांचाही समावेश होता.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की अफगाण सैन्याला प्रत्युत्तरात्मक कारवाई करावी लागली. त्यांनी सांगितले की अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. स्थानिक रुग्णालयाने 80 हून अधिक महिला आणि मुलांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

पाकिस्तानने दावा केला की त्याचे सैन्य दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीमेवरील आपल्या चौक्यांवर झालेल्या तालिबानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत होते. या हल्ल्यांमध्ये अर्धसैनिक दलाचे 6 जवान ठार झाले.