वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय कर्मचारी यापुढे वयोवृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी 30 दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतात. ही तरतूद इतर व्यक्तिगत कारणांसाठीही असू शकते, अशी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी सुट्टी घेण्याची तरतूद आहे का, असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्यावर कामगार मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले. या प्रश्नावर कामगार राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. त्यात म्हटले की, सेंट्रल सिव्हिल सर्विसेस लिव्ह कायदा 1972 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची अर्जित रजा मिळू शकते.

याशिवाय दरवर्षी 20 दिवसांची अर्धवेतन रजा, 8 दिवसांची प्रासंगिक रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे. या रजांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्व-निर्धारित सुट्ट्या मिळत राहतील ज्यासाठी ते पात्र आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारमध्ये रिक्त पदांची भरती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी विविध विभाग आणि मंत्रालयांच्या गरजांवर अवलंबून असते. ही सुविधा केवळ पुरुष कर्मचाऱ्यांसाठी नाही तर महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे.