ममतांच्या राज्यात आणीबाणी लागू होणार? राज्यपालांनी सोपवला केंद्राला अहवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम बंगालमधील हिंसक परिस्थितीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्री यांना भेटून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा अहवाल दिला आहे. तर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यातील हाणामारीच्या घटना वाढतच आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात पश्चिम बंगालमधील हिंसाचार रोखण्यात ममता दीदींचे तृणमूल सरकार पुर्णत: अपयशी ठरल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील अधिकारीच जाणून बजून हिंसाचार वाढवत असल्याचे या अहवालात म्हटले असून अशा आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाची यादीच सादर केल्याची माहिती येत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अहवालानंतर पश्चिम बंगालमध्ये निमलष्करीदलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या