आता आरपीएफ जवानांच्या वर्दीवर नाइट व्हीजन कॅमेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांच्या युनिफॉर्मवरच आता कॅमेरे बसविलेले दिसणार आहेत. हे कॅमेरे नाइट व्हीजन कॅमेरे असून त्यामुळे रात्रीच्या वेळीही हे काम करणार असून ते सर्व्हरशी कनेक्टेड असल्याने आरोपींचा माग घेणेही सोपे होणार आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या युनिफॉर्मवर खांद्याजवळ हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे आरोपींची चौकशी करताना कामी येणार आहेत. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर हा कॅमेरा बसविला जाणार आहे. या कॅमेऱ्यांची किंमत प्रत्येकी 30 ते 40 हजार इतकी असणार असून मध्य रेल्वेने त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 40 कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रात्रीच्या वेळी गस्तीसाठी उपयोगी
या कॅमेऱ्यामध्ये नाइट व्हीजन तंत्रज्ञान असल्यामुळे आरपीएफ जवानांना पेट्रोलिंग करतानाही त्याचा वापर होणार आहे. गाड्यांमधील चोऱ्यांसह गाड्यांमध्ये शिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींवरही हे कॅमेरे लक्ष ठेवतील.

रेकॉर्डवरील गुन्हेगार सापडणार
ड्युटीवर असताना हे कॅमेरे सतत कार्यरत राहणार असल्याने कोणत्याही प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाकडे सबळ पुरावा राहणार आहे. तसेच हे रेकॉर्ड सर्व्हरशी कनेक्ट करण्यात येणार असल्याने जर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एखादा आरोपी असेल तर तो लगेच ओळखला जाणार आहे. प्रवासामध्ये काही वेळा प्रवासी आणि तिकीट तपासनिसांमध्ये वाद घडत असतात. अशावेळी घटनास्थळी हजर असलेल्या आरपीएफच्या जवानांच्या खांद्यावरील हे छोटेखानी कॅमेरे उपयोगी पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.