रियासी येथे भाविकांच्या बसवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तीन दिवसात तीन ठिकाणी हल्ले झाले. या हल्ल्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ ठोस पावले उचलत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर न देणारे केंद्रीय गृहमंत्रालय आज अखेर चार दिवसांनी खडबडून जागे झाले. आज रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. बैठकीत अमरनाथ तीर्थयात्रेसाठीची सुरक्षा व्यवस्था आणि जम्मू-कश्मीरच्या विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सध्याच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ऍक्शन प्लॅनही तयार करण्यात आला.
शिवखोडी मंदीराकडून कटरा येथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली यात 10 भाविकांचा मृत्यू झाला होता. हे लक्षात घेता अमरनाथ यात्रेप्रसंगी दहशतवादी हल्ल्याची घटना घडू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी तपास यंत्रणांना सतर्क राहाण्याचे निर्देश दिले. अमरनाथ यात्रा 29 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सुरक्षा संस्थांनी समन्वय साधून संवेदनशील क्षेत्रांची निवड करून तेथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अशी असेल सुरक्षा व्यवस्था
अमरनाथ यात्रेसाठी संपूर्ण सुरक्षा कवच देण्यात येईल. डॉमिनेशन आणि झिरो टेरर प्लॅनच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. यात्रेच्या मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात असेल.
तीर्थक्षेत्रांकडे येणाऱ्या महामार्गांवर अतिरीक्त सुरक्षा दल तैनात करण्यात येईल. येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येईल
जम्मू-कश्मीरमध्ये शिवखोडीसह सर्व तीर्थस्थळे आणि पर्यटन स्थलांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल.
ज्या पॉईंटवरून दहशतवादी घुसखोरी करतात त्या सर्व पॉईंट्सवर बारीक नजर ठेवण्यात येईल. अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पपर्यंत जाणाऱ्या मार्गावर अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येईल.