एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे सीईटी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने सीईटी सेल आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालात गुण आणि श्रेणी देण्यात चूक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे याविषयी तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची दखल घेत युवासेनेच्या वतीने सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
सीईटी परीक्षा वेगवेगळय़ा बॅचद्वारे घेऊन त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. प्रत्येक बॅचसाठी प्रश्नपत्रिकादेखील वेगवेगळी असते. युवासेनेने याच बाबीला आक्षेप घेतला आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी गुणवत्ता यादी वेगवेगळी जाहीर करण्यात यावी, त्यापेक्षा एकच प्रश्नपत्रिकेसह एकाच वेळी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुणदेखील त्यांच्या गुणपत्रिकेत दर्शविण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेच्या वतीने माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात वेळीच सुधारणा करून दिल्यास त्यांना पुढील प्रवेशात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी सीईटी सेलने घ्यावी, असेही युवासेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सीईटी सेलमधील भोंगळ कारभाराविरोधात युवासेना उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे.