
हलगी, पैचाळ, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गगनचुंबी ससानकाठय़ांची मिरवणूक, श्री जोतिबाचा पारंपरिक लवाजम्यासह नयनरम्य पालखी सोहळा, सोबत, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड गजरात, गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण करत, आज वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक श्री जोतिबाच्या दर्शनासाठी नतमस्तक झाले.
परंपरेनुसार आज चैत्र पौर्णिमेदिवशी चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा झाला. पहाटे तीनपासून धार्मिक विधींना सुरुवात झाली. पहाटे 5 ते 6 या वेळेत श्रींचा शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सकाळी 10च्या सुमारास महावस्त्र्ाासह महापूजा करून दुपारी धुपारतीसह पंचारती करण्यात आली. या वेळी श्री जोतिबाची सरदारी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी हस्त नक्षत्रावर म्हालदार, चोपदारांच्या उपस्थितीत तोफेच्या सलामीने राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठय़ांचे विधिवत पूजन करण्यात आले.
यात्रा आणि पावसाचे समीकरण
जोतिबाच्या चैत्र यात्रेत सायंकाळी हमखास पावसाची हजेरी असते. यंदाही लाखो भाविकांच्या भक्तिरसात चैत्र यात्रेचा उत्साह शिगेला पोहचला होता. एकीकडे कडकडीत उन्हात सासनकाठय़ा नाचवत गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण करणाऱ्या भाविकांच्या घामाच्या धारा वाहत असताना भक्तिरसात तल्लीन झालेल्या भाविकांना दुसरीकडे मात्र पावसाने सुखद गारवा दिला. दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पावसाने श्री जोतिबा डोंगरासह सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे जिकडेतिकडे पाणीच पाणी झाले होते. साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातून वाट काढताना भाविकांची त्रेधातिरपीट उडाली होती.




























































