पहिल्याच दिवशी चंदन-उटी पूजा बुकिंग फुल्ल; विठ्ठलाच्या 48 तर रुक्मिणी मातेच्या 46 पूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पारंपरिक चंदनउटी पूजा भाविकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याकरीता शुक्रवारी (दि. 13 रोजी) ऑनलाईन बुकींगव्दारे भाविकांनी सहभाग नोंदविला. पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या 48 तर रुक्मिणी मातेच्या 46 चंदनउटी पूजांचे बुकींग फुल्ल झाले आहे.

श्री विठ्ठलच्या चंदन उटी पूजेसाठी एकूण 48 पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रति पूजेस 21,000 इतके देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे या सर्व पूजा पूर्णपणे बुक झाल्या आहेत. तसेच श्री रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 46 पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रति पूजेस 9,000 इतके देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या सर्व पूजा देखील पूर्णपणे बुक झाल्या आहेत. चंदन उटी पुजा या भाविकांची गर्दी विचारात घेता चैत्री यात्रा व अधिकमास महिन्याचे दिवस वगळून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सर्व पूजाविधी नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या चंदन उटी पूजेसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्व पूजा अल्पावधीतच बुक झाल्या आहेत.भाविकांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक संदेश भोसले यांनी भाविकांचे आभार मानले आहेत.

94 पूजांव्दारे 14 लाखांचे उत्पन्न
ग्रीष्म ऋतूमध्ये वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या मूर्तींना शीतलता लाभावी, या परंपरेनुसार चंदनउटी पूजा संपन्न केली जाते. चंदनउटी पूजा श्रीं विठ्ठल रुक्मिणीच्या पोषाखानंतर दुपारी 4.30 ते 5.15 या वेळेत करण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या 48 तर रुकिमणीच्या 46 पूजांमधून मंदिर समितीला 14 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.