चंद्रपूर – महापौरांच्या गाडीसाठी VIP क्रमांकावर उधळपट्टी, चौकशीची आमदार जोरगेवार यांनी केली मागणी

चंद्रपूरच्या महापौरांच्या नव्या वाहनासाठी व्हीआयपी नंबर विकत घेण्यात आला आहे. MH 34 BV 1111 असा हा नंबर असून त्यासाठी 70 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या व्हीआयपी नंबरवरून सजग नागरिकांनी महापालिका आयुक्तांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. कोरोना काळात निधी नसल्यामुळे व्हेंटीलेटर, ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी निधी अभावी लोकांना जीव गमवावा लागला असताना आता व्हीआयपी नंबरसाठी अशा पद्धतीने पैसे उधळणं हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न राजेश बेले या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.

संजीवनी सामाजिक व पर्यावरण संस्थेला महापौरांच्या गाडीसाठी व्हीआयपी नंबर विकत घेतल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी पाठपुरावा करत हा नंबर किती रुपयांना खरेदी केला याची माहिती गोळा केली. हा नंबर 70 हजार रुपयांना विकत घेतल्याची धक्कादायक माहिती या संस्थेला मिळाली होती. राजेश बेले यांनी याबाबतची तक्रार संबंधित अधिकारी आणि विभागांकडे केली असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राखी कंचर्लावार या चंद्रपूरच्या महापौर आहेत तर राजेश मोहिते हे आयुक्त आहेत. दरम्यान, महापौरांच्या गाडीसाठी व्हीआयपी क्रमांकावर उधळपट्टी केल्या प्रकरणी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी  कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या