Chandrapur News – प्राचीन वारली चित्रशैलीला जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रोत्साहन, विध्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे सर्व स्तरातून कौतुक

हिंदुस्थानातील आदिवासी संस्कृतीची ओळख असणारी प्राचीन वारली चित्रशैली लोप पावत असल्याचे चित्र आहे. या चित्रशैलीचे पुनरुज्जीवन करण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रपूर जिल्हातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू करण्यात आला. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कला वारली चित्रशैलीच्या माध्यामातून दाखवण्याची संधी मिळाली.

जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये वारली चित्रशैलीच्या चित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याचा हा भाग आहे. एकीकडे जिल्हातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था कोडमळल्याचे भयावह चित्र आहे. असे असताना गोंडपिपरी येथील शिक्षकांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासोबत प्राचीन वारली चित्रशैलीचे कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे सुखावणारे चित्र आहे. गणितीय भौमितिक आकार त्रिकोण, गोल व आयाताचा वापर करून प्राचीन वारली चित्रकला विकसीत झालेली आहे. पारंपरिक वाद्य वाजविणारे, गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री-पुरूष, शेतीचे कामे करणारा शेतकरी, बैलगाडी, घरे, पशू-पक्षी, देवी-देवता अशी विविध वारली जीवनशैली विद्यार्थ्यांनी चित्रित केली आहे. शाळेच्या आवारात वारली चित्र शैलीचे प्रदर्शन ठेवण्यात आले. याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.