काँग्रेस खासदारासमोरच अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण, खाण व्यवस्थापन गप्प

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे पुढे होते, असाही आरोप करण्यात येत आहे.

निवडून येताच खासदाराच्या भावानं अशी वर्तणूक केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना कानाखाली लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले. उपस्थित पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.

अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नाही. खुद्द खासदारांच्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याचा आरोप होत आहे. निकाल लागताच धानोरकर यांच्या नातेवाईकांमध्ये मुजोरी आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, यासंदर्भात कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला. असं काही घडलं नाही, असं म्हणत त्यांनी वृत्त फेटाळून लावलं.