चंद्रपुरच्या पुरंध्री! हिस्रप्राण्यांपासून शाळेत जाणाऱ्या मुलांचे रक्षण करण्यासाठी चार महिलांचा पुढाकार, मुलांना सुरक्षित घरी आणण्यासाठी जीवाची बाजी

chandrapur purandhari 4 brave women protect school kids from wild animals

पुरंध्रीचा एक अर्थ होतो रक्षणकर्त्या स्त्रीया पूर्वीच्या काळात लढण्यासाठी जेव्हा गावातील पुरुष वर्ग रणांगणावर जायचे तेव्हा स्त्रीया पुढाकार घेत गावाचे, आबालवृद्धांचे रक्षण करायच्या. चंद्रपुरात वन्यजीवांचा वावर असलेल्या अरण्यवाटेवरून शाळेत जाणाऱ्या मुलांचे रक्षण करण्यासाठी चार महिलांनी पुढाकार घेतलाय. त्यांना चंद्रपुरच्या पुरंध्री अशी ओळख मिळत आहे.

जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात वसलेल्या गावातील या महिला आपल्या मुलांना सुरक्षित घरी आणण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्याचीच ही कथा. पोटचा गोळा म्हणजे आईसाठी जीव की प्राण. मुलासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्यागाचे नाव म्हणजे आई. हीच माय मुलांच्या रक्षणासाठी हातात काठ्या घेऊन हिंस्त्र प्राण्यांचा सामना करणासाठी पुढाकार घेते, तेव्हा ती प्रेरणा बनते. अशाच चार रणरागिणींची ही कथा आहे. वेणू रंदये, किरण गेडाम, सीमा मडावी आणि रीना नाट यांची ही वास्तविक कथा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील निबीड अरण्यात वसलेल्या सीताराम पेठ इथली ही गोष्ट आहे. जेमतेम एक हजार लोकवस्तीचे हे गाव. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत अरण्यात वसलेले. गावात शिक्षणासाठी चौथीपर्यंत व्यवस्था आहे; मात्र पुढील शिक्षणासाठी मुलांना बाहेरगावी जावे लागते. गावातून मुख्य रस्त्यावर यायचे म्हणजे जीवावर उदार होणे. पण तरीही मुले बस, ऑटो पकडायला मुख्य मार्गापर्यंत यायची. मात्र अलीकडच्या काही वर्षात वाघांची आणि इतर हिंस्त्र प्राण्यांची संख्या वाढली. त्यामुळे गावशेजारी प्राणी येऊ लागले. सकाळी शाळेत जाताना तेवढा धोका नव्हता; पण शाळेतून परतताना अंधार पडत असल्याने धोका कमालीचा वाढला. कधी वाघाचे गुरगुरणे, तर कधी अस्वलाच्या किंचाळ्या ऐकू यायच्या. तेव्हा मुले जीवाच्या आकांताने कच्च्या रस्त्याने घराकडे धावत सुटायची. मुलगा घरी येईपर्यंत पालकांच्या जीवात जीव नसे. भय संपायची चिन्हे दिसत नव्हती. यातून मार्ग कसा काढायचा, हा विचार सुरू असतानाच गावातील चार महिलांनी पुढाकार घेण्याचे ठरवले. आणि त्या मुलांना मुख्य रस्त्यापर्यंत सोडू लागल्या आणि सायंकाळी घ्यायला जाऊ लागल्या. गावापासून मुख्य डांबरी रस्त्याचे अंतर जवळपास अर्धा किलोमीटर. महत्त्वाचे म्हणजे या महिलाही निःशस्त्र असायच्या. पण मुलांच्या जीवासाठी त्यांनी स्वतःची पर्वा केली नाही.

दोन महिन्यांपूर्वी त्यांचे हे कार्य सुरू झाले. याची माहिती ताडोबा व्यवस्थापनाला मिळाली आणि त्यांनी कौतुकाची थाप देत त्यांना रक्षणासाठी काही साहित्य दिले. यात एक काठी, विद्युत काठी, टॉर्च आणि जॅकेट याचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या धाडसाला मातृशक्ती उपक्रम असे नावही दिले. ताडोबाच्या बफर क्षेत्रात असे कार्य करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, यासाठी एक हजार रुपये प्रतिमहिना प्रोत्साहन राशी जाहीर केल्याच वन परिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले. जिथे खुद्द वाघच पाचवीला पूजला असेल, तिथले भय संपणार कसे, हा प्रश्न असला तरी त्यावर उत्तर शोधणाऱ्या महिला वाघापेक्षाही सामर्थ्यवान म्हटल्या पाहिजे.