‘चांद्रयान- 1’ मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे निधन, 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘चांद्रयान 1’ मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले आहे. बऱ्याच काळापासून ते किडणीच्या आजाराने ग्रासले होते. शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या विज्ञान जगताचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,श्रीनिवास हेगडे यांनी 1978 ते 2014 पर्यंत इस्रोमध्ये काम केले आहे. याशिवाय, यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC) चे सदस्य असताना त्यांनी अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी शास्त्रज्ञ आणि URSC संचालक डॉ. एम अन्नादुराई यांनी श्रीनिवासूर हेगडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 1982 मध्ये जेव्हा ते इस्रोमध्ये रुजू झाले तेव्हा हेगडे त्यांचे बॉस होते, त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये मोठी मदत केल्याचे सांगितले.

चांद्रयान मिशन 1,मुळे श्रीनिवास हेगडे प्रसिद्धीच्या झोतात आले. या मोहिमेद्वारे हिंदुस्थानने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता. यानंतर ‘चांद्रयान 2’ आणि ‘चांद्रयान 3’ देखील प्रक्षेपित करण्यात आले. ‘चांद्रयान 3’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला होता. सेवानिवृत्तीनंतरही हेगडे बऱ्यापैकी सक्रिय होते. त्यांनी बंगळुरूमध्ये एका स्टार्ट अपमध्ये काम केले. ते आयुष्यभर प्रयोग करत राहिले, त्यांच्या कल्पना नेहमी विज्ञानाला पुढे नेण्याच्या होत्या. याच कारणामुळे आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही त्यांचे विज्ञानावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.