
अमृतसर येथील हिंदुस्थान-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रिटच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही रिट्रिट अटारी-वाघा सीमेवर दररोज होत असून देशभक्तीने वाहणारा हा समारंभ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या ठिकाणी येत असतात. ही रिट्रिट आता सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होऊन 6 वाजता संपेल. याआधी ही रिट्रिट 5 वाजता सुरू होऊन साडेपाच वाजता संपत होती.
देशातील हवामान आणि कमी जास्त होत असलेल्या प्रकाशाचा विचार करून प्रशासनाने वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिट्रिट पाहण्यासाठी आलेल्या देशभक्तांना चांगला अनुभव मिळावा आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. रिट्रिटच्या वेळेत झालेला हा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आला आहे. बीटिंग रिट्रिट सेरेमनी ही हिंदुस्थान-पाकिस्तान सैनिकांकडून केली जाणारी एक विशेष परंपरा आहे. यामध्ये उत्साह, शिस्त आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळते. ही रिट्रिट पाहण्यासाठी लोकांचा प्रचंड उत्साह असतो. यावेळी उपस्थित लोक गगनभेदी घोषणा देऊन परिसर आसमंत आवाजाने दणाणून सोडतात.

























































