
सातारा जिह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या स्वतंत्र चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबत भाजप आमदार अमित साटम यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करत महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट आणि या प्रक्रणातील दोन्ही आरोपींबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने सखोल चौकशी सुरू आहे. महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटमधील अक्षर हे पीडितेचेच असल्याचे न्यायवैद्यक तपासणीत आढळून आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शोषण आणि फसवणूक
या प्रकरणातील पहिला आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे, तर दुसरा आरोपी प्रकाश बनकर याने फसवणूक केल्याचे आढळून आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.




























































