गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ 620 एकर जमीन बळकावली

नंदूरबारचे रहिवासी असलेले आणि सध्या  गुजरातमधील अहमदाबाद येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी सातारा जिह्यातील कांदाटीतील 620 एकर जमीन बळकावल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जबाबदार घटकांवर फौजदारी कारवाईचे आदेश पारित करावेत, अन्यथा 10 जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.

जैवविविधता आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी सुरू केलेल्या सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत माहिती अधिकारातून ही माहिती पुढे आली असून, जिह्यातील सर्वात अतिदुर्गम व पर्यावरणीयदृष्टय़ा अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱया कांदाटी खोऱयाचा ‘मुळशी पॅटर्न’ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत वळवी, त्यांचे पुटुंबीय, नातेवाईक अशा एपूण 13 जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केले आहे. यातून तेथील 620 एकराचा भूखंड बळकावल्याचे समोर आले आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, वन (संरक्षण) अधिनियम, 1976 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे हा चिंतेचा विषय आहे असे ते म्हणाले.

 

गुजरातमधील नेत्याचा निकटवर्तीय

झाडाणी येथील संबंधित भूखंडमाफिया हा गुजरात येथील एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्या नेत्याच्या आशीर्वादानेच येथे एवढे मोठे अनधिपृत रिसॉर्ट बांधकाम होत आहे. दरम्यान, रेणुसे ते झाडाणीवरून उचाट ते रघुवीर घाट हा दोन पदरी रस्तादेखील होत आहे. या रस्त्याची आवश्यकता नसतानाही हा रस्ता केला जात आहे, यासाठी डांबर प्लांटसुद्धा रेणुसे गावात अनधिपृतपणे सुरू आहे. मात्र, या कांदाटी-नंदूरबार-गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे मोरे यांनी सांगितले.