
शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱयाला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या खटल्यांत न्यायालयाने आरोपीला सहा महिने कारावास आणि सुमारे 4 लाख 45 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश गिरीश देशमुख यांनी हा निर्णय दिला.
आरोपी रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून पेप्सी, पेप्सी कोला इत्यादी पेये विक्रीसाठी खरेदी केली होती. या खरेदीपोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी 50 हजार, 60 हजार, 52 हजार 605 व 60 हजार रुपयांचे असे चार चेक दिले होते. मात्र, कल्याणकर यांनी बँकेत भरलेले हे चेक न वटता परत आल्याने फिर्यादी अनंत कल्याणकर यांनी आरोपी रोहित हासे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच यासाठी ऍड. विजयानंद पगारे यांच्यामार्फत पैशाची मागणी करणारी नोटीसदेखील पाठविली होती. नोटीस मिळाल्यानंतरदेखील हासे याने कल्याणकर यांना पैसे परत केले नाहीत. त्यामुळे कल्याणकर यांनी ऍड. पगारे यांच्यामार्फत हासे याच्या विरोधात संगमनेर न्यायालयात चेक बाउन्सप्रकरणी स्वतंत्र चार केसेस दाखल केल्या होत्या.
न्यायाधीश गिरीश देशपांडे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. तक्रारदाराचे वकील ऍड. विजयानंद पगारे आणि आरोपीचे वकील यांच्या युक्तिवादादरम्यान विविध खटल्यांचा आधार घेण्यात आला. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तक्रारदाराची बाजू मान्य करत आरोपी रोहित बाळासाहेब हासे याला दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येक खटल्यात चेकच्या दुप्पट रक्कम म्हणजेच प्रत्येकी 1 लाख रुपये, 1 लाख 20 हजार रुपये, 1 लाख 5 हजार 210 रुपये आणि 1 लाख 20 हजार रुपये असे सुमारे चार लाख 45 हजार रुपये फिर्यादी तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले.
—