Railway accident news – चेन्नई सेंट्रल-न्यू जलपाईगुडी सुपरफास्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षातही रेल्वे अपघातांचे सत्र सुरूच आहे. ताजी घटना ओडिशातील जाखपुरा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.चेन्नई सेंट्रल ते न्यू जलपाईगुडी या सुपरफास्ट एक्सप्रेसचे डबे गुरुवारी सकाळी ओडिशातील जाखपुरा रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी घडली. सुरुवातीला एका डबा घसरल्याची माहिती समोर आली होती, मात्र स्थानिक पोलिसांनी 3 डबे रुळावरून घसरल्याचे सांगितले आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. प्रवाशांना तातडीने मदत पुरवण्यात आली असून त्यांची व्यवस्था अन्य डब्यांमध्ये करण्यात आली आहे. ही एक किरकोळ दुर्घटना असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तांत्रिक पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. रेल्वे मार्ग लवकरच पूर्ववत केला जाईल.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भद्रक आणि खुर्दा रोड येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय उपकरण गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्रशन मल्लिक यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे जेनापूर स्थानकावर हलवण्यात आले आहे. तसेच रेल्वेने प्रवाशांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी 8114382367 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. सध्या डबे दुरुस्त करण्याचे आणि रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.