
>> प्रभा कुडके
बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होताक्षणी त्याने चांगलीच मुसंडी मारली. ‘नमः पार्वतीपतये हर हर महादेव’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ या घोषणांनी सिनेमागृहातील वातावरण दुमदुमले. सिनेमागृहातील प्रत्येकाच्या ओठी केवळ ‘छावा’चा म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराजांचा जयजयकार सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाची प्रतीक्षा सर्व रसिक प्रेक्षकांना होती. या चित्रपटामध्ये धर्मवीर संभाजीराजे यांचा जीवनपट गुंफण्यात आला असल्यामुळे हिंदुस्थानातील शिवप्रेमींमध्ये चित्रपट प्रदर्शनापूर्वी चांगलाच उत्साह होता. चित्रपटाचे पहिल्या दिवसापासूनच सकाळचे सर्व शो हाऊसफुल्ल असल्यामुळे ‘छावा’ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाईचे बिगुल फुंकले.
सिनेमात अभिनेता विकी काwशल, रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असून अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका वठवली आहे. यासोबत चित्रपटामध्ये सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर, सारंग साठये आदी मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘छावा’ बघून चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक केवळ ‘छावा’चेच गुणगान गात होता. येत्या आठवडय़ाभरात ‘छावा’ किती भरघोस कमाई करणार हे पाहणे आता बाकी आहे.
आगाऊ बुकिंगमधून 13 कोटींची कमाई
- आगाऊ बुकिंगच्या माध्यमातूनच या चित्रपटाने 13 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. अवघ्या देशभरातील सिनेमागृहांमध्ये 4 लाखांपेक्षा जास्त तिकीट विक्री झाल्यामुळे ‘छावा’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडी सध्याच्या घडीला ‘छावा’चा बोलबाला आहे.
- अभिनेता विकी कौशलने साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत, तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदानासुद्धा वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. ‘छावा’ हिंदुस्थानसह परदेशातही प्रदर्शित झालेला आहे.