
राज्यातील शिवभोजन केंद्रचालकांचे पैसे देण्यास उशीर झाल्याची कबुली देतानाच येत्या 20 मार्चपासून सर्व केंद्रचालकांना पैसे देण्यास सुरुवात होईल, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवभोजन थाळी योजना राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी सुरू झाली होती. त्या योजनेमुळे महिला बचत गटांना आणि युवकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली. 9 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह या योजनेमुळे होत आहे. मात्र गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शिवभोजन केंद्रचालकांचे अनुदानाचे सुमारे 200 कोटी रुपये शासनाने थकवल्याने केंद्रचालकांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सना मलिक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
छगन भुजबळ यांनी या लक्षवेधीला उत्तर दिले. ‘काही अडचणींमुळे शिवभोजन केंद्रचालकांचे पैसे देण्यास अडचण आली. चालू अर्थसंकल्पात 220 कोटी रुपयांची आणि पुढच्या वर्षीसाठीही आणखी 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,’ असे भुजबळ यांनी सांगितले.
थकीत रकमेवर केंद्रचालकांना व्याज देण्यात यावे कारण अनेक केंद्रचालक अनुदान थकल्याने व्याजाने पैसे घेऊन केंद्रे चालवत आहेत, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी केली.
तक्रारींमुळे 63 केंद्रे बंद
राज्यात एकूण 2258 शिवभोजन केंद्रे मंजूर आहेत. त्यापैकी 1875 केंद्रे सुरू होती. त्यामधील 385 केंद्रे बंद आहेत. त्यातील 63 केंद्रांबाबत तक्रारी आल्याने ती जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. अनुदानाची थकीत रक्कम मिळाल्यानंतर बंद केंद्रे पुन्हा सुरू होतील, असे भुजबळ म्हणाले.






























































