राज्यसभेसाठी मीही इच्छुक होतो, पण प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मी नाराज नाही असे सांगत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली, पण या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, पण महायुतीचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता.
यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. पक्षाची काही बंधने असतात. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. मी नाराज असल्याचे माझ्या तोंडावर दिसते का? मी नाराज नाही. पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून तुम्हाला डावलले जात आहे का, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी केला. त्यावर मी कालच्या बैठकीला उपस्थित होतो. मग मला कुठे डावलले, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपेही इच्छुक होते, मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार यांचा काही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नव्हते असे भुजबळ यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले.