लाच न दिल्याने नर्सने प्रसुती करण्यास दिला नकार, महिलेची बाथरुममध्ये प्रसुती होऊन नवजात बाळाचा मृत्यू

मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लाच न दिल्याने परिचारिकेने एका गर्भवतीची प्रसुती करण्यास नकार दिला. तिच्या या लाचारीपणामुळे महिलेने बाथरुममध्येच मुलीला जन्म दिल्याने जमिनीवर पडून नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच संताप पसरला आहे.

मध्य प्रदेशात भ्रष्टाचाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहे. लाच घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही घटना ईशानगर येथील आहे. एक आदीवासी कुटुंब गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ईशानगर आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. त्यावेळी आरोग्य केंद्रात ड्युटीवर असलेली परिचारिका प्रीति प्रजापतीने महिलेच्या कुटुंबियांकडे 2 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावर परिचारिका संतापली आणि तिने प्रसूती कळांनी विव्हळत असलेल्या महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. त्यानंतर वेदनेने कळवळत असलेल्या महिलेने बाथरुममध्येच बाळाला जन्म दिला आणि नवजात बाळ जमिनीवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नवजाताच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी परिचारिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.परिचारिकेने कर्तव्य बजावताना गर्भवती महिलेला मदत केली असती तर कदाचित या परिस्थितीत तिच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला नसता, असेही सांगितले. लाचखोरीमुळे नवजात मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी ईशानगर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी आता त्या परिचारिकेचे निलंबन करण्यात आले आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागानेही तत्काळ कारवाई करत परिचारिका प्रीती प्रजापती यांना तत्काळ  निलंबित केले. आरोग्य विभागाचे प्रादेशिक संचालक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि बीएमओच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.