
लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बुडाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जबाजारी उद्योजकाला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत, दोन मांत्रिकांनी त्याला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढले. महावीर चौक, जालना रोडवरील रविराज हॉटेलमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तांत्रिक प्रयोगाचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या कटात सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती की, या हॉटेलमध्ये कासव आणले आहे. जादूटोणा करून त्यावर प्रयोग करण्यात येत असल्याच्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे यांच्या पथकाने 11 जून, सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान हॉटेल रविराज येथे छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी विकास प्रकाश उत्तरवार (42, रा. खडको बाजार, ता. हिमायतनगर, जि. नांदेड), विलास देवराव कुहिले (42, रा. जुरूळ, ता. वैजापूर) आणि शंकर बबनराव काजळे (36, रा. चिकलठाणा) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा, कोरे चेकबुक्स, जादूटोण्याचे साहित्य आणि लाखो रुपयांचे धनादेश जप्त करण्यात आले आहेत.
हॉटेल रविराजच्या रूम नंबर 310 आणि 314 क्रमांकाच्या रूममध्ये काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. हे व्यक्ती बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा कट रचत असून, त्यासाठी जादूटोण्याचा वापर करून हा खटाटोप करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ हॉटेल गातून रिसेप्शनवर चौकशी केली असता संबंधित रूमची नोंद विकास उत्तरवार आणि सचिन बराटे या दोघांच्या नावाने असल्याची माहिती हॉटेल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली, पोलिसांनी तत्काळ रूममध्ये धाव घेऊन छापा टाकला. या छाप्यामध्ये विकास उत्तरवार, विलास कुहिले, शंकर ऊर्फ माऊली काजळे आणि दिलीप कापसे हे तेथे आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात महा. नरबळी, जादूटोणा प्रतिबंधित कायद्याच्या कलम 3 (2), बीएनएसच्या 2023 च्या कलम 3(5) आणि कलम 318 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार धर्मेंद्र शिंदे करीत आहेत.
कुहिले, काजळे दुप्पट तिप्पट रक्कम करून देतात…
पोलिसांनी हॉटेलच्या रूममध्ये छापा टाकला असता चौघेजण आढळून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता विकास उत्तरवार याने सांगितले की, विलास कुहिले आणि शंकर काजळे हे दोघे जाट्टोणा करतात. या जादूटोण्यातून त्यांच्या जवळील रोख रक्कम दुप्पट-तिप्पट करतो, तर दिलीप कापसे याने आपण त्यांचे मित्र आहोत, त्यांनी जेवणाचा डबा मागितला होता तो घेऊन आला होता, असे सांगितले. मात्र, या जादूटोण्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे कापसे याने सांगितले.
बनावट नोटा, धनादेशासह सापडले जादूटोण्याचे साहित्य
विकास उत्तरवार याच्या अंगझडतीत मोबाईल, विलासकडे मोबाईल आणि एका न्यूजचे ओळखपत्र सापडले. तसेच शंकर ऊर्फ माऊली याच्याकडून मोबाईल जप्त केला. तसेच आयसीआयसीआय, कोटक आणि येस बँकांचे कोरे धनादेश, 50 हजार रुपये मूल्याच्या भरलेल्या धनादेशाचे बंडल, 1400 रुपये किमतीच्या 200 आणि 100 रुपयांच्या 8 बनावट नोटा आणि 48 पॅकेट्समध्ये अज्ञात वनस्पती, वाळलेले लिंबू, जादूटोण्याची बाटली, नारळ असे जादूटोण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.