
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 3 सदस्य पळविल्याची माहिती मिळताच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट पंचायत समितीच्या भाजप सदस्याची कॉलर पकडून जाब विचारताच एकच गोंधळ उडाला. दानवे आक्रमक झाल्याचे पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर निवडणूक होऊन भाजपचे कल्याण गायकवाड सभापती झाले.
पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणूकीपूर्वी शिवसेनेचे तीन सदस्य पळविण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांना मिळाली. त्यामुळे दानवे संतप्त झाले. दानवे यांनी भूमीअभिलेख कार्यालयाजवळ असलेले पंचायत समिती कार्यालय गाठले. कार्यालयाबाहेरच भाजपचे काही पंचायत समिती सदस्य उभे होते. दानवे त्यांच्याजवळ गेले. एका भाजप सदस्याची कॉलर पकडून शिवसेनेचे सदस्य कुठे लपवले असा जाब विचारला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला.
दानवे यांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दानवे हे पंचायत समितीबाहेर तळ ठोकून होते. शिवसेनेचे पळविलेले तीन सदस्य मतदानासाठी गैरहजर राहिले. दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. सभापतीपदी भाजपाचे कल्याण गायकवाड विजय झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनुराग शिंदे यांचा एक मताने पराभव केला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची विशेष सभा आज घेण्यात आली. या सभेत सभापती, उपसभापती पदाची निवड करण्यात आली. सभापती पदासाठी भाजपचे कल्याण गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुराग शिंदे यांच्यात लढत झाली. गायकवाड यांना 9 आणि शिंदे यांना 8 मते पडली. उपसभापती पदासाठी बाळासाहेब गाढे आणि बाबासाहेब राठोड यांच्यात लढत झाली. गाढे यांना दहा तर राठोड यांना सात मते पडली त्यामुळे गाढे हे तीन मताने निवडून आले आहेत असे जाहीर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन सदस्य पळविल्याची माहिती मिळताच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट पंचायत समितीच्या भाजप सदस्याची कॉलर पकडून जाब विचारला. @iambadasdanve pic.twitter.com/JCx81pPZd3
— Saamana Online (@SaamanaOnline) March 10, 2026
या संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले की, पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी आज पंचायत समिती कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती. या निवडणूकीसाठी शिवसेनेचे तीन सदस्य भाजपने पळवून नेल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर गेलो होतो. त्याठिकाणी भाजपचे पंचायत समिती सदस्य कल्याण गायकवाड यांना शिवसेना सदस्य कुठे असे विचारले, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

























































