सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदीप आपटे याला आज रात्री अटक करण्यात आली. कुटुंबीयांना भेटायला लपूनछपून आलेल्या जयदीप आपटेला कल्याण बाजारपेठ पोलीस आणि गुन्हे शाखेने घरातून ताब्यात घेऊन अटक केली. राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आपटेवर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तो फरार झाला होता.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना कल्याणमधील नवखा शिल्पकार जयदीप आपटे याने अत्यंत तकलादू काम केले. शिवरायांचा हा पुतळा कोसळल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात प्रक्षोभ उसळला. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून आपटेवर गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी कल्याण येथील घरून मालवणला निघालेला जयदीप आपटे फरार झाला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील घरातून ताब्यात घेतले.
शिवरायांचा पस्तीस फूट पुतळा बनवण्याचे कंत्राट ठेकेदार आणि शिल्पकार जयदीप आपटे याला देण्यात आले होते. हा पुतळा उभारल्यानंतर गेल्या वर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र 26 ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. पुतळ्या कोसळल्यानंतर पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी पाटील याला अटक करण्यात आली तर जयदीप आपटे फरार होता. अखेर दोन आठवड्यानंतर त्यालाही अटक झाली आहे.
लूकआऊट नोटीसही जारी केली होती
पोलिसांनी आपटेच्या शोधासाठी सात पथके रवाना केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी आपटेविरोधात 3 सप्टेंबर रोजी लूकआऊट नोटीसही जारी केली होती. कोणत्याही राष्ट्रीय विमानतळावरून बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तत्काळ ताब्यात घेण्यासाठी ही नोटीस होती. त्यानंतरही आपटे पोलिसांना सापडत नसल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते
सिंधुदुर्ग पोलिसांनी ताबा घेतला
पुतळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग पोलिसातही आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आपटेच्या कल्याण येथील घरी येऊन झाडाझडती घेतली होती. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक कल्याण मध्येच थांबले होते. आज आपटेला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रथम त्याला डीसीपी कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला.
घरात शिरला आणि जेरबंद झाला
दरम्यान आज रात्री उशिरा जयदीप आपटे हा चोरून लपून त्याच्या कल्याणमधील दूध नाका गुप्ते चौकातील घरी आई आणि पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे पोलिसांनी घराभोवती सापळा रचला. आपटे घरात शिरताच पोलिसांनी झडप घालून त्याला जेरबंद केले.