फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक

कोरोना काळातही उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधी विद्यापीठाला निधीची कमतरता होऊ दिली नाही, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे फडणवीसांसमोर भरभरून कौतुक केले.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी एकदा नव्हे, तर किमान तीन-चार वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आणि कौतुक केले. महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या निर्मितीबाबत बोलताना भूषण गवई म्हणाले, या विधी विद्यापीठाचे 2016 साली भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला भरपूर निधी दिला गेला. 2019 मध्ये त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आले. या वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता. त्यांनी कोरोना काळातदेखील विद्यापीठाला निधीची कमतरता होऊ दिली नाही, असे सांगत त्यांचे कौतुक केले.

विधी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, दुसऱ्या वेळी ते विरोधी पक्ष नेता होते. त्यानंतर तिसऱ्या वेळी ते उपमुख्यमंत्री म्हणून विद्यापीठ कार्यक्रमास उपस्थित राहिले. आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमाला उपस्थित आहेत, असे सरन्यायाधीश म्हणाले.