
वीटभट्टीवर बाल मजुरांकडून काम करून घेणाऱ्या मालकाला म्हसळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नामदेव रानवडे असे मालकाचे नाव असून त्याच्या ताब्यातून चार मुलांची सुटका करण्यात आली. म्हसळामधील वाघमारे कुटुंब रोजगारासाठी पुण्यात गेले होते. ते परत गावी आले असता मालकाने मात्र त्यांच्या चार मुलांना स्वतःकडे ठेवले आणि त्यांना वीटभट्टीच्या कामाला जुंपले होते.
म्हसळा तालुक्यातील तोराडी येथे राहणारे प्रकाश वाघमारे व त्यांच्या पत्नी सुनीता वाघमारे हे चार मुलांसह पुण्यातील मुळशी येथे वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. वीटभट्टीमालक नामदेव रानवडे याच्या छळाला कंटाळून वाघमारे दाम्पत्य गावी परतले. मात्र मालकाने त्यांच्या चार मुलांना जबरदस्तीने स्वतःजवळ ठेवले. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने पुण्याला जाऊन सूरज वाघमारे (15), राहुल वाघमारे (13), मनोज वाघमारे (11) व अश्विनी वाघमारे (9) या चारही मुलांची सुरक्षित सुटका केली. सुटका केलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी वीटभट्टीमालकास ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांचे आवाहन
रोजगारासाठी स्थलांतर करताना स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत तसेच कोणत्याही प्रकारचा छळ सहन न करता त्वरित पोलीस 100/112 किंवा चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



























































