मुलांना अनुभवता येणार ऐतिहासिक सफर, विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात प्रदर्शन

मुलांना भूगोल, इतिहास, विज्ञान आणि कलेच्या संगमातून ऐतिहासिक सफर घडवण्याचे काम विलेपार्ले येथे होणाऱ्या पुरातत्व खात्याच्या प्रदर्शनातून होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. दगडांची, नकाशांची, शस्त्रांची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. प्रदर्शन 16 ते 18 मे पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाहता येणार असून 10 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. मुलांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

विलेपार्ले येथे होणाऱया या प्रदर्शनात खडकांचे, खनिजांचे आणि जीवाश्मांचे अनोखे नमुने, शिवकालीन आणि मोंगलकालीन शस्त्रसंग्रह, सुंदर प्राचीन नकाशे स्टिरिओस्कोप अनुभवासह, जीवनाचा प्रारंभ दर्शवणारी दगडी अवजारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह पाहता येणार आहे तर ब्राह्मी आणि क्युनिफॉर्म लिपींवर कार्यशाळा होणार आहे. त्याचबरोबर जुन्या नाण्यांचा दुर्मीळ संग्रह पाहता येणार आहे. यावेळी डॉ. प्रवीण हेचिक्स (जिऑलॉजी), डॉ. प्रतीक चक्रवर्ती (जीवाश्म), डॉ. अपर्णा फडके (नकाशा अभ्यास), शैलेंद्र क्षीरसागर (पुरातत्व व लिपी तज्ज), राधा साव (ब्राह्मी लिपी), डॉ. नम्रता विश्वास (प्रागैतिहासिक अवजारे), रिद्धी जोशी हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पुरातत्व आणि म्युझियम्स संचालनालय, भूगोल विभाग (मुंबई विद्यापीठ) आणि जीवाश्म विभाग- डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थांचाही यात सहभाग आहे. प्रदर्शनाला इन्स्टुसेन ट्रस्ट आणि प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल यांचे सहकार्य लाभले आहे.